About आगम

कला, विचार आणि मूल्यांचा सर्जनशील प्रवास

उज्ज्वल शिक्षण मंडळ, रत्नागिरी संचलित आगम - द कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट हे शैक्षणिक दालन सुरू करताना आम्हाला अत्यंत आनंद व अभिमान वाटत आहे.

या संस्थेचा मुख्य उद्देश केवळ पदवी किंवा प्रमाणपत्र प्रदान करणे एवढाच मर्यादित नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हा आहे. ज्ञान, संवेदना, कौशल्य आणि जीवनमूल्ये यांचा समतोल साधणारे शिक्षण देणे हेच आमचे ध्येय आहे.

आगम द कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट ही संस्था प्राचीन भारतीय शिक्षण परंपरेने प्रेरित आहे. प्राचीन महर्षींच्या गुरुकुल परंपरेपासून ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या आदर्श शिक्षणतत्त्वज्ञानापर्यंतचा विचारांचा अभ्यास करून ही शिक्षणव्यवस्था उभारण्यात आली आहे.

अनुभवाधारित शिक्षण, विचारस्वातंत्र्य, संवेदनशीलता आणि व्यक्तिमत्व विकास यांचा समतोल साधणे हेच आमचे शिक्षणतत्त्व आहे.

“शिक्षण म्हणजे माहिती संकलित करणे नव्हे, तर मन, मेंदू आणि शरीराला अधिक सक्षम करणे.”

कला शिकवली जात नाही, तर तिचा बोध, अभ्यास, आकलन आणि समरसता जागवली जाते. ड्रॉईंग, डिझाईन, रंग, कॉम्पोझिशन हे केवळ विषय नसून संवेदनशीलता विकसित करण्याची साधने आहेत. आमचा विद्यार्थी केवळ व्हिज्युअल डिझायनर न राहता एक संवेदनशील आणि प्रभावी संवादक बनला पाहिजे.

टागोरांच्या मते, “जिथे प्रश्न थांबतात, तिथे शिक्षण मरते.” म्हणून येथे प्रश्न विचारणे, संवाद साधणे, चर्चा करणे आणि स्वतंत्र विचार मांडणे याला प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्याला नुसते अनुकरण नव्हे, तर स्वतःचा दृष्टिकोन विकसित करायला शिकवले जाते. भारतीय कला, तत्त्वज्ञान, सौंदर्यदृष्टी यांचा पाया आणि आधुनिक डिझाईन थिंकिंग, तंत्रज्ञान व जागतिक दर्ज्यांची मागणी यांचा संगम या संस्थेत अनुभवायला मिळतो. विद्यार्थी स्थानिक मातीत रुजलेला असला तरी तो जागतिक पातळीवर संवाद साधू शकणारा असावा, हीच आमची विचारधारा आहे.

या कॉलेजसाठी शिक्षणाचा उद्देश केवळ करिअर घडवणे नसून जबाबदार, संवेदनशील, सर्जनशील आणि प्रामाणिक कलाकार घडवणे हा आहे. अनुभवाधारित व कृतीशील शिक्षण ही आमच्या प्रक्रियेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो. कोणाची ताकद रेखाटनात, कोणाची रंगसंगतीत, तर कोणाची संकल्पनात्मक विचारात. त्यामुळे एकाच साच्यात बसणारी शिक्षणपद्धती आम्ही मानत नाही. विद्यार्थ्याच्या नैसर्गिक गुणांना ओळखून त्याला अनुरूप मार्गदर्शन देणे हेच आमचे तत्त्व आहे. कला ही निसर्ग आणि समाजातून जन्माला येते. म्हणून निसर्ग निरीक्षण, स्थानिक संस्कृती, लोककला, हस्तकला आणि सामाजिक वास्तव यांची जाणीव हे अप्लाईड आर्ट शिक्षणाचे अविभाज्य घटक आहेत.

आजच्या आधुनिक उद्योगविश्वात कौशल्यासोबत संवेदना, नैतिकता आणि जबाबदारीची जाणीव असलेले कलाकार आवश्यक आहेत. डिझाईन, आर्ट, इनोव्हेशन, लीडरशिप आणि शाश्वत विकास या क्षेत्रांमध्ये सर्जनशीलता, शिस्त आणि अंतर्मनाची जाणीव यांना मोठे महत्त्व आहे. हीच मूल्ये भारतीय गुरुकुल पद्धतीच्या केंद्रस्थानी होती. म्हणून आधुनिक शिक्षणात गुरुकुल तत्त्वांचा समावेश करणे म्हणजे भूतकाळात जाणे नव्हे, तर भविष्यासाठी अधिक मानवी, सर्जनशील आणि शाश्वत मार्ग स्वीकारणे होय. परंपरा, तत्त्वज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम असलेले हे आर्ट स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्जनशील प्रवासाचे सक्षम दालन ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.


येथे कला ही केवळ विषय नसून जीवन समजून घेण्याची एक सखोल प्रक्रिया आहे.

ड्रॉईंग, डिझाईन, रंगसंगती, कॉम्पोझिशन यांसोबतच विचारस्वातंत्र्य, संवेदनशीलता आणि व्यक्तिमत्व विकास यांवर विशेष भर दिला जातो.

भारतीय कला, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा पाया घेत आधुनिक डिझाईन थिंकिंग, तंत्रज्ञान आणि जागतिक डिझाईन यांचा समन्वय साधणारे शिक्षण येथे दिले जाते.

प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे, या विश्वासावर आमची शिक्षणपद्धती आधारलेली आहे. त्यामुळे वैयक्तिक मार्गदर्शन, अनुभवाधारित शिक्षण आणि कृतीशील अभ्यास यांवर भर देण्यात येतो.


आगम म्हणजे कला, विचार आणि मूल्यांचा समतोल प्रवास होय.

Applied Art म्हणजे काय?

Applied Art म्हणजे अशी कला जी केवळ सौंदर्यासाठी नसून दैनंदिन जीवनात उपयोगात येते आणि समाजाशी प्रभावी संवाद साधते.

जाहिरात, ग्राफिक डिझाईन, ब्रँडिंग, पॅकेजिंग, वेबसाईट डिझाईन, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांमध्ये Applied Art चे महत्वाचे स्थान आहे.

आगम मध्ये विद्यार्थी केवळ डिझायनर नाही, तर संवेदनशील, जबाबदार आणि सर्जनशील संवादक बनतो.